पैठण, (प्रतिनिधी) : कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २३ बैलांची पाचोड पोलिसांनी धडक कारवाई करत सुटका केली. असून या कारवाईत १२ लाख ६० हजार रुपये किमतीचे २३ बैल, १२ लाख रुपये किमतीचे आयशर बंद बॉडी वाहन असा एकूण २४ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी वाहनचालकास अटक करण्यात आली असून वाहनमालकासह अन्य दोन साथीदार फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २८ ऑक्टोबर २०२६ रोजी पाचोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन
पंडित यांना गुप्त बातमीदारामार्फत धुळे सोलापूर महामार्गावरून एका आयशर बंद बॉडी वाहनातून गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस हवालदार रणजितसिंग दुल्हत व पोलीस अंमलदार राम आयनले यांना तपासणीसाठी रवाना करण्यात आले.
-- पाचोड पोलिसांची कारवाई; वाहनचालकास अटक, वाहनमालकासह दोघे फरार --
दरम्यान, धुळे - सोलापूर महामार्गावरील रजापूर शिवारात हॉटेल स्वामिनी जवळ संशयित आयशर वाहन (क्रमांक २० ३७९७) आढळून आला. पोलिसांनी हे वाहन ताब्यात घेऊन पाचोड पोलीस ठाण्यात आणले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये २३ बैल आढळून आले. वाहन चालकाकडे जनावरांच्या वाहतुकीसाठी आवश्यक परवाना किंवा संबंधित कागदपत्रे नसल्याचेही तपासात निष्पन्न झाले.
या प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४४० / २०२६ अन्वये महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११ तसेच भारतीय न्यायसंहिता कलम ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जप्त करण्यात आलेल्या २३ बैलांना गोशाळेत सोडण्यात आले. या प्रकरणी वाहनचालक शेख एसटी, शेख लोकमान करेशी (रा. समया मशीदजवळ, ईदगाह नगर, सिल्लोड ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) यास २९ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली आहे. तर वाहनमालक व अन्य दोन साथीदार फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन पंडित, पोलीस उपनिरीक्षक महादेव नाईकवाडे. पोलीस हवालदार रणजीतसिंग दुल्हत, अंमलदार राम आयनले, पोलीस अंमलदार नागनाथ केंद्रे, पोलीस हवलदार विजय ठोकळ आदींनी केली आहे.














